
परभणी, दि.१ २ मार्च : पाथरी रोड परिसरातील काही ठिकाणी टर्निंग पॉईंटवर वाढलेल्या झाडांच्या फांद्या व झुडपांमुळे वाहनचालकांना रस्ता स्पष्ट दिसत नसल्याने अपघाताचा धोका निर्माण होत होता. या पार्श्वभूमीवर जीवनदूत फाउंडेशन, परभणी यांच्या वतीने ब्लाइंड स्पॉट असलेल्या ठिकाणी स्वच्छता व सुरक्षितता उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अविनाश चोंडे सर यांनी प्रत्यक्ष स्थळी ब्लाइंड स्पॉट दाखवून वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनानुसार त्या टर्निंग पॉईंटवरील झाडांची झुडपे, लहान फांद्या आणि वाढलेले गवत ब्रश कटर मशीनच्या साहाय्याने कापून काढण्यात आले, ज्यामुळे वाहनचालकांना रस्ता अधिक स्पष्टपणे दिसू लागला आहे.
रस्ते अपघातांची संख्या शून्यावर आणण्याच्या उद्देशाने जीवनदूत फाउंडेशन हा उपक्रम सातत्याने राबवत आहे. नागरिकांनी देखील अशा उपक्रमात सहभागी व्हावे आणि ज्या ठिकाणी टर्निंग पॉईंट किंवा रस्त्यालगत झाडे-झुडपे वाढून अपघाताचा धोका निर्माण होत असेल, त्या ठिकाणाची माहिती फाउंडेशनला द्यावी, असे आवाहन करण्यात आले. इच्छुक नागरिकांनी श्रमदान करून या मोहिमेत सहभागी होऊ शकतात, तसेच संस्थेकडून मशीनच्या साहाय्याने झुडपे कापून अपघात रोखण्यासाठी मदत केली जाईल.
या उपक्रमावेळी जीवनदूत फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पठाण मोहसीन खान व कार्याध्यक्ष शेख आयुब यांची प्रमुख उपस्थिती होती. संस्थेच्या या पुढाकारामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून रस्ते सुरक्षित करण्यासाठी असे उपक्रम सातत्याने राबविण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.








