
परभणी : जिल्ह्यात रस्ता सुरक्षा जनजागृतीच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या जीवनदूत चॅरिटेबल ट्रस्ट, परभणीचे संस्थापक अध्यक्ष पठाण मोहसीन खान यांना सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल विश्व मानवाधिकार परिषद यांच्या वतीने पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.
बी. रघुनाथ सभागृह येथे आयोजित कार्यक्रमात परभणीचे महापौर सय्यद इकबाल यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी महापौर सय्यद इकबाल यांनी रस्ता सुरक्षेचे महत्त्व अधोरेखित करताना अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी जनजागृती, वाहतूक नियमांचे पालन आणि नागरिकांचा सहभाग आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच जीवनदूत चॅरिटेबल ट्रस्टच्या रस्ता सुरक्षा जनजागृतीसाठी सुरू असलेल्या कार्याचे कौतुक करून पठाण मोहसीन खान यांचे अभिनंदन केले.
या कार्यक्रमाला संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष हाजी लायक सर, वाय. के. नारायणपूरकर, ॲड. हादी अहमद, फरहाना मॅडम, फय्याज शेख, शोएब बेग आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
रस्ता अपघात रोखणे, नागरिकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जागरूकता निर्माण करणे आणि सुरक्षित प्रवासाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी जीवनदूत चॅरिटेबल ट्रस्ट सातत्याने विविध उपक्रम राबवत आहे. या पुरस्कारामुळे संस्थेच्या सामाजिक कार्याला प्रोत्साहन मिळाले आहे.

